Skip to main content

फोर्टफेरी

☀ दक्षिण मुंबईतली एक संध्याकाळ. चाकरमानी लोक आजची नोकरी करून इमानदारीत घरी चालले आहेत.
महानगराच्या भव्य,डौलदार वास्तूंभोवती तिन्हीसांजा मिळून येत आहेत.
मी निरुद्योगी, रिकामटेकडा, भणंग वगैरे.
चाकरमान्यांच्या उलट दिशेने जात जात भटकतोय.
व्हिटीपासून निघून लांब फेरी मारून परत व्हिटीलाच येणारी बस.
संथगतीने जातेय.
बसमधून मी मजेत बघतोय फोर्टमधली माणसे, दुकाने आणि इमारती.
संधीप्रकाश आणि वीजेच्या दिव्यांच्या प्रकाश.
मिसळण झाली आहे.
असं रात्री, मुंबईत बेस्ट बशीतून आरामात फिरताना मस्तच वाटतं हे मला लहानपणी जाणवलं होतं.
इतकी दशके झाली तरी अजूनही आवडतय.
म्युझियमजवळ पोचलीय बस. हिवाळ्याचे दिवस. हवेत छान गारवा आहे. कंटक्टरबुवासुद्धा छान मूडमधे बोलताहेत पब्लिकबरोबर.
अशा हवेत चालत, चालत फिरूया असं वाटून मी बसमधून उतरलो.
रीगलपासून गेटवेला व तिथून पुढे ताजच्या समोरून भटकंती.
समोर समुद्राच्या काळ्या पाण्यात रंगीत, हलती प्रतिबिंबे. होड्यांवरील दिव्यांचे चमचमणारे रंग.
डावीकडे कोपऱ्यात गेटवेची मॅजेस्टिक कमान. मागे ऐश्वर्यसंपन्न ताज.
सगळ्या भवतालात ब्रिटिशकालीन बॉम्बेचा संमोहक राजसपणा.
तिथून पुढे चालत चालत कुलाबा बाजार.
रस्ता ओलांडताना वेडसर, भिकारी वाटणारा एकजण शेजारून बडबडत निघून जातो.
'उगाच इथेतिथ भटकत फिरू नकोस, अभ्यास कर नियमित, इंजिनीयर हो.' असला उपदेश करायची मोठी माणसे मी कॉलेजात असताना.
तेव्हाही मी असंच दूर्लक्ष करायचो.
मी बस पकडायला रिगलसमोर येतो. चर्चगेटला जायला.
स्टॉपवर एक मुलगी. पंधरासोळा वर्षांची. कोणती बस चर्चगेटला जाईल असं मला विचारते. डोळ्यात मुंबईबद्दलचं कुतुहल आणि चेहऱ्यावर तरूण उत्साह.
माझ्याबरोबर बसमधे चढते. पुढे बसते व स्टॉप आला की सांगा असं कंडक्टरला सांगते.
कंडक्टर आपल्याच कामात. राजाबाई टॉवरजवळ बस येते तरी ती मुलगी
शांतपणे मोबाईलमधे डोकं खुपसून बसलीय. इथल्या सिग्नलला बस बहुदा थांबतेच. जवळच चर्चगेट स्थानक आहे. कंडक्टरचा थंडपणा पाहून मीच हे त्या मुलीला सांगतो.
इतक्यात आपण पोचलोही ह्याचं फारच आश्चर्य दाखवत ती घाईघाईत माझ्यासोबत उतरते.
चर्चगेटला जायचं कसं हे मला विचारते.
इथून मिनीटभर अंतरावरच तर आहे चर्चगेट हे समजल्यावर परत एकदा तरूण, कोवळ्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरतं.
ह्यात इतकं चकीत होण्यासारखं काय आहे असं मला वाटतं आणि हसू येतं.
मग मला आठवतं की मी तेरा-चौदा वर्षांचा असताना असाच कुतुहलाने फिरत असे मुंबईत.
नवखा टीनएजर असतानाच जर ह्या महानगराचा संमोहक परिचय झाला तर असं आश्चर्य पसरत असावं चेहऱ्यावर .
ओव्हल मैदानातून फिरत फिरत मी मैदानातच एका ठिकाणी बसतो.

हायकोर्ट आणि राजाबाई टॉवर.
रात्रीच्या अंधारात, सोनेरी प्रकाशात परिकथेतल्या राजवाड्यांसारखे दिसत असतात.


- सुबोध केंभावी
mumbaisubodh21@gmail.com ****************** Image Rajabai Clock Tower night.jpg
from Wikimedia Commons, the free media repository

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चंदूचा मेंदू आणि शंभर शक्यता.

वयाच्या पहिल्या दहाबारा वर्षांमधे वाचनाची आवड लागली नाही तर त्यानंतर त्याची शक्यता खूप कमी होत जाते. मराठी शाळांमधील मुलांना वाचनाची आवड लागावी ह्यासाठी जे प्रयत्न होत असतात ते समजून घेणे आणि त्याबाबत नवीन उपक्रम व प्रकल्प करणे हा माझ्या आवडीचा व काही प्रमाणात कामाचाही भाग आहे. प्रयोगशील आणि पर्यायी शिक्षणातील काही निवडक पद्धती व विचार औपचारिक शिक्षणात कशा रुजवता येतील ह्याबाबत समजून घ्यायला मला आवडतं. भाषाशिक्षण, विज्ञानशिक्षण व कार्यानुभव अशा विषयांचा मिलाफ प्राथमिक शाळेत झाला पहिजे हा असाच एक पर्यायी शिक्षणातील विचार आहे. तो बहुतेक मराठी शाळांमधे रुजलेला नाही. मराठी शाळांबाबत इतरही बऱ्याच अडचणी आणि गोंधळ आहेत. मागील पंधरा वर्षे मी पालक व शिक्षकाबंरोबर शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही काम करतो आहे. ह्या विषयावरचा एक लेख मी २०१५सालच्या पालकनीती दिवाळी अंकात लिहिला होता. तो खालील दुवा वापरून वाचता येईल. चंदूचा मेंदू आणि शंभर शक्यता ह्या लेखाचा दुवा (लिंक)