☀ दक्षिण मुंबईतली एक संध्याकाळ. चाकरमानी लोक आजची नोकरी करून इमानदारीत घरी चालले आहेत. महानगराच्या भव्य,डौलदार वास्तूंभोवती तिन्हीसांजा मिळून येत आहेत. मी निरुद्योगी, रिकामटेकडा, भणंग वगैरे. चाकरमान्यांच्या उलट दिशेने जात जात भटकतोय. व्हिटीपासून निघून लांब फेरी मारून परत व्हिटीलाच येणारी बस. संथगतीने जातेय. बसमधून मी मजेत बघतोय फोर्टमधली माणसे, दुकाने आणि इमारती. संधीप्रकाश आणि वीजेच्या दिव्यांच्या प्रकाश. मिसळण झाली आहे. असं रात्री, मुंबईत बेस्ट बशीतून आरामात फिरताना मस्तच वाटतं हे मला लहानपणी जाणवलं होतं. इतकी दशके झाली तरी अजूनही आवडतय. म्युझियमजवळ पोचलीय बस. हिवाळ्याचे दिवस. हवेत छान गारवा आहे. कंटक्टरबुवासुद्धा छान मूडमधे बोलताहेत पब्लिकबरोबर. अशा हवेत चालत, चालत फिरूया असं वाटून मी बसमधून उतरलो. रीगलपासून गेटवेला व तिथून पुढे ताजच्या समोरून भटकंती. समोर समुद्राच्या काळ्या पाण्यात रंगीत, हलती प्रतिबिंबे. होड्यांवरील दिव्यांचे चमचमणारे रंग. डावीकडे कोपऱ्यात गेटवेची मॅजेस्टिक कमान. मागे ऐश्वर्यसंपन्न ताज. सगळ्या भवतालात ब्रिटिशकालीन बॉम्बेचा संमोहक राजसपणा. ...